या राज्यात चाललंय तरी काय ? – देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला प्रश्न



महाराष्ट्र राज्यात सरकारच्या अरेरावी विषयी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अतिशय चुकीच्या शब्दात टीका केली, सोबत ते हे ही म्हणाले, “मी नरेंद्र मोदी यांना मारु शकतो.” त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधीपक्ष आक्रामक झाला असून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे, सोबत ते हे ही म्हणाले कि, “अजब न्याय. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मारण्याची भाषा ज्यांनी केली, त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि या अराजकतेवर कारवाईची मागणी करणार्‍या भाजपाच्या लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांना जागोजागी ताब्यात घेण्याची कार्यवाही…या राज्यात चाललंय तरी काय ?”



एकूणच पटोलेंच्या या वादग्रस्त विधानावर भारतीय जनता पक्ष आक्रामक झाला असून त्यांनी या वरुन काँग्रेसची पळता भुई थोडी केली आहे. “आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत काँग्रेस शासित पंजाब राज्यात पाकिस्तान सीमेजवळ गोंधळ होतो, ज्यावर बोलण्यास तेथील मुख्यमंत्री सरळ नकार देतात, आणि आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी यांना मारण्याची भाषा करतात. याला काय म्हणावं ? असेही फडणवीस म्हणाले. य़

“काँग्रेस कुठल्या दिशेने पुढे जात आहे ? एकेकाळी स्वातंत्र्य संग्रामात पुढे असणारी काँग्रेस आज केवळ सत्तेच्या हव्यासापोटी इतक्या खालच्या थराला गेली आहे? नाना भाऊ शारीरिक उंची सोबत राजकारणात बौद्धिक उंची देखील असणे गरजेचे असते” असे म्हणत फडणवीसांनी नाना पटोले यांच्यावर सणकून टीका केली.



याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आक्षेप घेत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले कि, “पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.”



मात्र एकूणच राज्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे, आणि नाना पटोले यांच्या विरोधात अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. आणि यावरुन देखील भाजप आक्रामक झाल्याचे दिसून आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येतात, कारण नसतानाही त्यांना घरातून अटक करण्यात येते, मग देशाच्या पंतप्रधानांवर इतक्या खालच्या पातळीची टीका करण्यात आली, तेव्हा त्यावर कुणी काहीच का बोलत नाही, असा प्रश्न विरोधीपक्षाने उपस्थित केला आहे.

या प्रकरणात पुढे काय घडते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.