माणूस पाहून कायदा ठरवला जातो, अशी राज्यातील परिस्थिती : फडणवीस



“लोकशाहीमध्ये नाना पटोले यांच्या सारखे विचारण असणं, लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. मी समर्थन करत नाही, मात्र आमच्या एका कार्यकर्त्याने मा. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हणून संबोधले तर त्यांच्या घरी रात्री बे रात्री पोलिस जाऊन कारवाई करते आणि त्यांना अटक करते आणि इथे पंतप्रधानांवर इतके मोठे विधान केल्यावर काहीच कारवाई होत नाही. म्हणजे आता राज्यात माणूस बघून कायदा ठरवला जातो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

“पोलिस विभाग जेव्हा सिलेक्टिव्ह होतो, तेव्हा राज्याची अधोगती होते.” असेही ते यावेळी म्हणाले. गोव्याला माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाणीची भाषा करण्यात आली, आणि त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. या अराजकतेवर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.



“कायद्याच्या कितीही चिंधड्या उडवा, वाट्टेल तसा पोलिसी दबाव आणा! भाजपाचा कार्यकर्ता मूग गिळून गप्प बसून सहन करणार नाही आणि या राज्यातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही.” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी “मी पंतप्रधानांना मारु शकतो.” असे वक्तव्य केले आणि राज्यात वादंग उठले. विरोधई पक्षाने हा मुद्दा उचलून धरला आहे. आणि यावरुन नाना पटोले यांच्यावर कारवाई ही  झालीच पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. या प्रकरणात आता पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.