नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असून राज्यात भाजपच नंबर १ चा पक्ष आहे, हे सिद्ध झाले आहे. याविषयी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “नगरपालिकेचे जे अंतिम निकाल आले, त्यात भाजपाने समर्थितसह सर्वाधिक 463 जागा प्राप्त केल्या. यातील 419 भाजपाच्या चिन्हावर आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती अशा तिन्ही निवडणुकांमध्ये क्रमांक 1 चा पक्ष भाजपाच ठरला. सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन!” अशा शब्दात फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“भंडारा आणि गोंदिया जिल्हा मिळून पंचायत समितीच्या 210 जागांपैकी सर्वाधिक 93 जागा भाजपाला मिळाल्या. (45% जागा) राज्यात भाजपा क्रमांक 1 चा पक्ष आहेच. तळागाळात सुद्धा लोक भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचेच या निकालांतून दिसून येते.” असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच “नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा भाजपानेच बाजी मारली. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाने पूर्ण बहुमत प्राप्त केले. राज्यात आमचे सरकार असताना सुद्धा ही जि.प. आमच्याकडे नव्हती. गेल्यावेळीपेक्षा 9 जागा अधिक प्राप्त करीत आम्ही यंदा ती पूर्ण बहुमतात येऊन जिंकली.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकूण संपूर्ण परिस्थितीवरून महाराष्ट्रात जनतेचा कल लक्षात येत आहे, तसेच राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बोलबाला सुरु झालेला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीतही असेच दृष्य दिसेल का, याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
