
“आम्ही 25 वर्षे भाजप सोबत युतीत राहून सडलो.” हे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले, त्यावर सणकून टीका करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का?” असा प्रश्न उपस्थित केला. नुकतेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, काल उद्धव ठाकरे यांनी युतीत सडलो असं वक्तव्य केलं. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे या युतीचे नेते होते. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? असा संशय आमच्या मनात येतोय, असं फडणवीस म्हणाले.
भाजपसोबत असताना ते नंबर एकचा पक्ष झाले होते आणि भाजप सोडल्या नंतर ते चौथ्या क्रमांकावर गेले, त्यामुळे कोणासोबत ते सडले याचा विचार त्यांनी करायला हवा.
तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचे मुबंईत अस्तित्व :
यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका करत फडणवीस म्हणाले कि, “2012 पर्यंत बाळासाहेब युतीत होते, त्यांच्या हयातीत शिवसेनेने युती कायम ठेवली मग असे वक्तव्य करताना मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या निर्णयावर संशय घेत आहेत का ? शिवसेना जन्माला यायच्या आधी आमचा नगरसेवक मुंबईत होता, आमचे आमदार मुंबईत होते. भाजपच्या चिन्हावर शिवसेना लोकसभेची निवडणूक लढली. भाजपच्या चिन्हावर मनोहर जोशी निवडणूक लढले. म्हणजे लक्षात घ्या कोण कुणासोबत सडलं.” असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला टोला हाणला.
भाषणापलिकडे तुमचे हिंदुत्व काय? :
यावेळी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत फडणवीस म्हटले कि, “राम जन्मभूमीसाठी लाठ्या काठ्या खाणारे आम्ही होतो. तुम्ही फक्त तोंडाच्या वाफा दवडत बसले. राम मंदिर मोदींनी करून दाखवलं, तुम्ही कमीत कमी दुर्गाडीचा प्रश्न तरी सोडवून दाखवा. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आम्ही अलाहबादचे नाव प्रयागराज करून दाखवलं. तुम्ही अद्याप उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नाव बदलून धाराशिव आणि संभाजीनगर करू शकले नाहीत. भाषणापलिकडे तुमचे हिंदुत्व काय? तुमचं हिंदुत्व केवळ कागदापुरतं आणि भाषणापुरतं मर्यादित आहे. ”
आम्ही वंदनीय बाळासाहेबांना आदराने अभिवादन करतो , मात्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कडून काल एखादं ट्वीज सुद्धा आलं का ? तुम्ही जे आता करत आहात, त्याला लाचारी असे म्हणतात. असे देखील ते यावेळी म्हणाले.
