
महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय खळबळ माजवणारा असा आजचा दिवस ठरला. आज ईडीने महाराष्ट्रातील सरकार मध्ये असलेले नेते नवाब मलिक यांना अटक केली. एक अतिशय गंभीर असे प्रकरण आज समोर आले. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या शहाब अली खान आणि सलीम पटेल जे हसीना पार्करचे फ्रंटमन होते त्यांच्याकडून ही बेकायदेशीर जमीन घेतल्याचे समोर आले आहे. मनी लॉंड्रिगची एक मोठी लिंक आज ईडीला सापडली आणि त्यावरुन हे प्रकरण बाहेर आलं. या संदर्भात आपले मत व्यक्त करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले कि, “मुंबई बॉम्ब स्फोटाच्या आरोप्यांकडून जमीन घेऊन देशाच्या शत्रु दाऊद सोबत हा व्यवहार करणारे नवाब मलिक यांना अटक झाली आहे, त्यांना अंडरवर्ल्डच्या माणसांकडून मनी लॉंड्रिंग करत दाऊदपर्यंत पैसा पोहोचविण्याची काय गरज पडली?” असा प्रश्न उपस्थित केला.
“हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयए आणि ईडी ने काही ऑपरेशन्स मध्यंतरीच्या काळात केले. या ऑपरेशन्स मध्ये त्यांना मोठी लिंक मिळाली, ज्यामध्ये त्यांना कळले की देशाचा शत्रु दाऊद रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय, आणि ही रिअल इस्टेटची कामे मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून होत आहेत. ९ ठिकाणी ईडी ने तपासणी केली, आणि त्यातीलच एक प्रकरण नवाब मलिक यांचे निघाले. मलिक यांनी संपत्ती त्यांनी हसीना पार्करचा राइट हँड शहाब अली खान आणि सलीम पटेल यांच्या कडून विकत घेतलेली आहे. केवळ अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली पावर ऑफ अटर्नी मलिक यांनी घेतली आणि संपत्तीच्या मालकांना एकही पैसा मिळालेला नाही. हसीना पार्कर जिथे सौदा करत होती, तेथील लोकांचे वक्तव्य देखील समोर आले आहेत. दाऊद भारतात टेरर फंडिंग करतोय, आणि या अशा व्यवहारांच्या माध्यमातून दाऊद पर्यंत पैसा जातोय. तो दाऊद ज्याने मुंबईत मोठे बॉम्ब स्फोट घडवले, ज्याच्यामुळे अनेक मुंबईकर, अनेक लोक आपल्या जीवाला मुकले त्या दाऊदला अशा पद्धतीने पैसा जाणे अतिशय भयंकर आणि गंभीर आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
“हा संपूर्ण व्यवहार (हजारो कोटी रुपयांची जमीन) कॅशमध्ये करण्यात आला, आणि हे पैसे दाऊद ला थेट मिळाले. एखाद्या मंत्र्याने किंवा मंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तिने मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी व्यक्ति कडून जमीन खरेदी करण्याचे कारण काय आहे ?” असा खणखणीत प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हा व्यवहार झाल्यानंतर तीन बॉम्ब स्फोट मुंबईत झाले :
“हा व्यवहार झाल्या नंतर मुंबईत तीन वेळा हल्ले आणि बॉम्बस्फोट झाले आहेत. जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, त्यांना जरका मंत्री पैसे देणार असतील तर हे अतिशय भयंकर आहे. जे बॉम्बस्फोटाचे आरोपी आहेत त्यांचे बयान घेतलेले आहे, अंडरवर्ल्डच्या लोकांनी ज्यांनी सौदा केला त्यांचे देखील बयान घेण्यात आले आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
या विषयावर राजकारण होऊ नये :
या संपूर्ण प्रकरणात टेरर फंडिंगचा एंगल स्पष्ट आहे. दाऊद जो या देशाचा सगळ्यात मोठा शत्रु आहे, त्याच्यासोबत असा व्यवहार करण्याचे समर्थन कसे केले जाऊ शकते ? या संपूर्ण प्रकरणात कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशा प्रकारे जर टेरर फंडिंग होत असेल आणि मुंबई स्फोटाच्या आरोप्यांकडून व्यवहार होऊन तो पैसा दाऊद कडे जात असेल तर याचा निषेधच केला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. मला अतिशय दु:ख आहे कि सरकारकडून राजीनामा न देण्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे देशात अतिशय चुकीचा संदेश जात आहे, “दाऊदला मदत करण्याऱ्याला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार त्याच्या पाठीशी उभे राहिले आहे.”. हे दुर्दैवी आहे. याविषयी राजकारण न करता, योग्य ती कारवाई करण्यात यावी. असेही ते यावेळी म्हणाले.
येत्या काळात “महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने खोटे पुरावे तयार करून लोकांच्या हिता विरोधात कार्य करत आहेत” या विषयी काही खुलासे मी करेन. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिली.
