हे सरकार नेमकं करतंय तरी काय ? – सामान्य नागरिक



महाराष्ट्रात सत्ता पालट झाले २०१९ मध्ये, ते देखील अतिशय नाटकीय पद्धतीने. युतीची माती झाली आणि शिवसेना सत्तेत आली ती देखील तीन पायांच्या खुर्चीला घाऊन. मात्र शिवसेना सत्तेत आल्यापासूनच या सरकारचे नाव चांगल्या कामांसाठी कमी आणि भ्रष्टाचार, हत्या, मारहाण आणि इतर प्रकरणांमध्ये जास्त दिसून येत आहे. या सरकारने काही विकास कामे केली, किंवा जनतेसाठी काही नवीन योजना आणल्या याची बातमी कमीच बघायला मिळते, मात्र सरकार सत्तेत आल्यापासून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या जनतेच्या हितासाठी नक्कीच नाही.

बघूयात हे सरकार सत्तेत आल्यापासून कुठल्या घटनांमध्ये सरकारचे नाव अधिक प्रसिद्ध झाले ?

१. महाराष्ट्र कोरोना मध्ये नंबर १ : 28 नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काही महिन्यांच्याच अंतरात भारतात कोरोनाचा प्रवेश झाला आणि एक नवीन जग समोर आलं. ठाकरे सरकारसाठी ही खरी वेळ होती आपली कुवत सिद्ध करण्याची, ज्या जोरावर भांडून खुर्ची हिसकावून घेण्यात आली होती, तो जोर आणि तो आत्मविश्वास सिद्ध करण्याची ही खरी वेळ होती, मात्र ठाकरे सरकार यामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाले. ज्यावेळी इतर राज्यांचे मुख्यमंत्री उदाहरणार्थ योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते आपल्या तब्येतीची चिंता न करता जनकल्याणासाठी, जनतेसाठी घराबाहेर पडत होते, त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने घरात थांबून कोमट पाणी पिण्याचे सल्ले देणारा एक मुख्यमंत्री बघितला. कोरोनाच्या प्रत्येका लाटेत महाराष्ट्र भारतात पहिल्या नंबर वर होते. मुंबईतील धारावी येथे कोरोनाचा संसर्ग सगळ्यात जास्त असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तिथे उतरले मात्र एकही शिवसैनिक त्याठिकाणी पत्रकारांना शोधूनही सापडला नाही. त्यावेळी मुंबईच्या सामान्य नागरिकांच्या मनात हीच का ती बाळासाहेबांची शिवसेना असा प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहिला नाही. एकूणच कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारल स्वत:ला सिद्ध करण्याची खूप मोठी संधी होती, मात्र केवळ स्वार्थामुळे आणि भेकाड प्रवृत्तिमुळे सरकारने ही संधी गमावली.

२. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यु : लॉकडाउन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामध्येच १४ जून २०२० रोजी एक भयंकर बातमी आली कि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. आणि त्यानंतर जे काही झालं ते आपण उघड्या डोळ्यांनी टीव्ही वर बघितले आहे. या सर्वात अनेक लूपहोल्स होते, पोलिसांनी पहिली तपासणी योग्य केली नसल्याचेही उघड झाले. अद्याप सुशांतचा मृत्यु अशा संशयास्पद रित्या का झाला ? ही आत्महत्या होती कि हत्या हे कोडे उलगडलेले नाही. या संपूर्ण प्रकरणात मोठी नावे असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे, सुशांतच्या आधी त्याच्या मॅनेजर दिशा सालियानने देखील एका उंची इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले. या दोन्ही मृत्युंमध्ये काही साम्य आहे का ? हे मृत्यु कनेक्टेड आहेत का ? अतिशय प्रतिभावान अभिनेत्याचा असा मृत्यु का व्हावा असे अनेक प्रश्न आज त्याच्या चाहत्यांसमोर आहे, मात्र या सगळ्याचे इन्व्हेस्टिगेशन नीट पार पडले नाही, आणि सरकारने हा प्रश्न सोडवण्यात रस का घेतला नाही ? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.



३. अर्णब गोस्वामी अटक प्रकरण
: त्यानंतर आले अर्णब गोस्वामी अटक प्रकरण. मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी विरोधात सूड उगवल्याचा आरोप अनेक सामान्य नागरिकांनी या प्रकरणामुळे केला आहे. एखादे जुने प्रकरण मुद्दाम उकरून काढून त्यात प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आली. मात्र हे अटक सत्र अतिशय नाट्यमय होतं. सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याने अर्णबला त्याच्या घरातून ओढून नेत त्याला अटक केली होती. त्यानंतर अर्णबला तासंतास बसवून त्याची चौकशी करण्यात आली. आपल्याच देशात एका दहशतवाद्याला चांगली वागणूक देतात, मात्र एका पत्रकाराला त्याहूनही वाईट वागणून का देण्यात आली, असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. हे प्रकरण खूप गाजलं. आणि नंतर याची चर्चा अधिकच झाली, त्याचे कारण तुम्हाला याच लेखात पुढे कळेल.

४. साधू मॉबलिंचिंग प्रकरण :
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव ज्या राज्यात मुख्यमंत्री आहेत त्या राज्यात पालघर जवळ दोन निरागस वयोवृद्ध साधूंची दगडांनी ठेचून ठेचून हत्या करण्यात येते. पोलिसाचा आधार म्हणून धरलेला हात, पोलिसंच संतापाने पेटलेल्या लोकांच्या घोळक्यात सोडून देते, आणि या साधूंना मरणाच्या दारात ढकलले. मात्र या संबंधात राज्य सरकारने पुढे काय केले? तर “या संपूर्ण प्रकरणाचा धार्मिक रंग देऊ नका”, “आमचा तपास सुरु आहे.” अशी पुळचट उत्तरं देत, या प्रकरणात म्हणावी तशी कारवाई केली गेली नाही. विचार करा या साधूंच्या ठिकाणी एखादा ‘अखलाक’ असता तर? तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल.

५. मनुसुख हिरेन हत्या प्रकरण : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर म्हणजेच एंटालिया बाहेर एक संशयास्पद स्कॉर्पियो गाडी मिळते आणि सुरुवात होते एका अतिशय भयंकर प्रकरणाला. ज्यातून सरकारचे अनेक ‘कच्चे चिट्ठे’ उघडले जातात. या गाडीशी संबंधित व्यक्ति मनसुख हिरने याचे शब ठाण्यातील एका खाडीत सापडले. सुरुवातीला त्याने देखील आत्महत्या केल्याचा आव पोलिस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणला. मात्र पोस्टमार्टम आणि इतर पुराव्यांच्या आधारे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण प्रकरणात पुन्हा त्याच पोलिस अधिकाऱ्याचे नाव आले, ज्याचे नाव आहे, “सचिन वाझे.” हे संपूर्ण प्रकरण भ्रष्टाचारापासून सुरु झाले, आणि याचा शेवट झाला मनसुख हिरेनच्या हत्येतून.

६. सिचन वाझे, अनिल देशमुख, परमबीर सिंह आणि १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार : त्यानंतर नंबर येतो सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराचा. या मनसुख हिरेन प्रकरणामुळे उलगडले महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे भ्रष्टाचार प्रकरण ज्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर त्यांच्यावर ईडीची चौकशी झाली, त्यांना अटक करण्यात आली. आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठले. परमबीर सिंह यांनी एका पत्रातून गौप्यस्फोट केला कि अनिल देशमुख यांनी मुंबई येथील विविध बार्समधून १०० कोटी रुपयांची वसूली करण्याचे आदेश दिले होते. आणि हा एक मोठा भ्रष्टाचार आहे असे स्पष्ट झाले.



७. नवाब मलिक आणि दाऊद प्रकरण : आणि आता नुकतंच समोर आलेले नवाब मलिक आणि दाऊद प्रकरण. नवाब मलिकांनी कौडीमोल भावात जमीन घेत त्याचा व्यवहार दाऊदच्या बहिणीसोबत म्हणजेच हसीना पार्करसाोबत केला, आणि एका अर्थी टेरर फंडिंग केलं. हे सर्व प्रकरण आणि यापेक्षाही मोठमोठी प्रकरणे एका पेनड्राइव्हच्या माध्यमातून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआयकडे दिले आहे, आणि एकूणच महाविकास आघाडीच्या या भ्रष्टाचार प्रकरणातून सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.

एका सरकारची एवढी मोठी ७-७ प्रकरणं. ते ही केवळ तीन वर्षांच्या आत. हे भयंकर नाहीये का ? या सर्व प्रकरणांमध्ये, भ्रष्टाचारामुळे, व्यवस्थेच्या अभावी मृत्युमुखी पडलेले लोक, विखुरलेले परिवार आणि एकूणच व्यवस्थेचा उडलेला बाजार हे सर्व पाहता सामान्य माणसाची यात काय चूक? आणि सामान्य माणूस सरकारला भ्रष्टाचार करण्यासाठी निवडून देतो, कि जनतेच्या कल्यणासाठी काम करण्यासाठी?

एकूणच या प्रकरणांचा गंभीरपणे विचार करण्यात यावा आणि पुढे सरकार निवडताना डोळसपणे निर्णय़ घ्यावा हेच काय ते वाटतं.