“शिवसेनेची लाचारी ही 2019 मध्येच दिसली जेव्हा ते भारतीय जनता पक्षाच्या नावावर आणि मोदीजींचे फोटो लावून निवडून आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला लाचारी बद्दल सांगूच नये” असा सणसणीत टोला विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला हाणला. नुकतेच माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला कि, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणताएत कि भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे. त्यावर आपले काय मत आहे?” या प्रश्नाला उत्तर देत त्यांनी वरील विधान केले. भाजपच्या नावावर निवडून येवून केवळ सत्तेसाठी राजकारण करण्याऱ्यांनी आम्हाला लाचारीबद्दल सांगूच नये, असे देखील ते यावेळी म्हणाले.

“सत्तेसाठी लाचार होवून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. शिवसेनेचे लोक अजान स्पर्धा घेत आहे, उर्दुघर बांधत आहेत. त्यामुळे ते एमआयएम सोबत गेले किंवा नाही गेले याने काहीच फरक पडत नाही. शिवसेनेने मोदीजींना राष्ट्रीय प्रश्नांवरुन विरोध केला. धारा 370 काढण्यात आली त्यावेळेला संपूर्ण देश भाजप आणि मोदीजींसोबत उभा होता, मात्र शिवसेनेन याला विरोध केला. त्यांना इतिहासच माहीत नाही.” असेही ते यावेळी म्हणाले.
लाल चौकात तिरंगा फडकवणारी शिवसेना नव्हती, तर ते काम भाजपने करून दाखवलं :
तसेच पुढे ते म्हणाले कि, “इतिहास लिहीला गेला आहे. सगळ्यांना आता माहीत आहे कि धारा 370 रद्दबातल भाजपने केलं, राम मंदिराचा प्रश्न भाजपने सोडवला आणि ज्यावेळेला लाल चौकात तिरंगा फडकवण्याची कुणाची हिंमत नव्हती, त्यावेळी शिवसेना नव्हती गेली, तिथे तिरंगा फडकवण्यासाठी. ते काम भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं.” असे म्हणत त्यांनी शिवसेनेना चांगलीच चपराक लावली आहे.
एकूणच महाराष्ट्राचे राजकारण दिवसेंदिवस अधिकच नाट्यमय होत चालले आहे. मग तो नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्न असू देत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेसमोर न येण्याचा. या संपूर्ण परिस्थितीत पुढे काय होणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
