
“भारतीय जनता पक्षाचे नेते सूडाचे राजकारण करत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच सूडाचे राजकारण करत नाहीत, करू शकत नाही, त्यामुळे किमान त्यांच्या राज्यात तरी कुठलीही सेंट्रल एजेंसी सूडाच्या भावनातून कधीच राजकारण करणार नाही. त्याचवेळी यालोकांनी (सत्तापक्षाने) महाराष्ट्राकडे बघितले पाहिजे, आणि कशा प्रकारे नसलेल्या गोष्टी तयार केल्या जाताएत. कशा प्रकारे प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई सुरु आहे. आमच्याविरुद्ध षडयंत्र यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून तयार करताएत. हे बघणं देखील आवश्यक आहे.” असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नागपूर येथे माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तर देताना ते बोलत होते.
“सरकार कोणतेही असेल तरी कारवाई ही योग्य झालीच पाहिजे, चुकीची कारवाई होता कामा नये. मी पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो, कि मोदीजींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊ शकत नाही.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
माध्यमांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला होता कि, “मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने जी कारवाई केली, त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जीतेंद्र आव्हाड यांचे असे म्हणणे आहे कि, केंद्र सरकार सूडाचे राजकारण करत आहे. यावर तुमचे काय मत?” त्यानंतर फडणवीसांनी वरील उत्तर दिले.
एकूणच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे महा भ्रष्टाचार आघाडी सरकार झाले असल्याचे दिवसेंदिवस समोर येत आहे मग ते अनिल देशमुख प्रकरण असू देत, नवाब मलिक प्रकरण असू देत किंवा आता मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेली कारवाई असू देत, एकूणच परिस्थिती कठीण असल्याचे दिसून येत आहे, यामध्ये पुढे आता काय होते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
