
पात्र असलेल्या लहान मुलांच्या सलीकरणावर आता आपला अधिक भर असणार आहे. जनजीवन संपूर्णपणे पूर्वपदावर यावे यासाठी आपल्याला अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोविड संदर्भातील बैठक पंतप्रधानांनी आयोजित केली होती. व्हिडियो कॉन्फरेंसिंगच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांनी कोव्हिड संदर्भात आयोजित केलेली आता पर्यंतची ही २४ वी बैठक आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी कोविड संसर्गात लक्षणीय वाढ झालेल्या दिल्ली, उत्तर प्रदेश, मिझोराम, कर्नाटक, हरियाणा या पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उपाययोजनांची माहिती दिली. या संपूर्ण बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत जांभया घेताना दिसले त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
“ही प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे की आपल्या प्रौढ लोकसंख्येपैकी 96% नागरिकांना कोरोना लसीच्या पहिल्या डोस दिला आहे. तर 15 वर्षांवरील वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी 85% लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. इतर देशांच्या तुलनेत कोविड संकट चांगल्या प्रकारे हाताळूनही आपल्या काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये वाढ पाहत आहोत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. कोविडचं संकट अद्याप टळलेलं नाही.” असं कोविड-19 परिस्थितीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे कुठल्याही राज्यातून समोर आले नाही. दिवसेंदिवस केसेस वाढत होते, मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोव्हिड रुग्णांची संख्या तुलनेने खूपच कमी होती. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे लसीकरणाचे कवच. आज देशातील अधिकांश पात्र जनता लसयुक्त आहे. तसेच आता लहान मुलांच्या लसीकरणावर आम्ही भर देत आहोत. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यापुढे कोरोनाची कुठलीही लाट योऊ नसे, आणि आल्यास त्याची तयारी असावी यासाठी या बैठका आयोजित करण्यात येत आहेत.
