
“देशात आज अघोषित आणीबाणी लावण्यात आली आहे. कुठलाही पत्रकार या सरकार विरोधात बोलल्यास त्याच्यावर हल्ला करण्यात येतो, कारवाई करण्यात येते. किती नावे घेऊ मी? अर्णब गोस्वामी, राहुल कुलकर्णी, विकास दळवी, राहुल झोडी, रघुनाथ बंसोडे, संदीप नागरे, नरसिंह खुळे. मोठी लिस्ट आहे. पत्रकारांनी विरोधात लिहीलं तर त्यांच्यावर हल्ले होतात, कोणी विरोधातही बोललं तरी त्याच्यावर हल्ले होतात.” असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी किरीट सोमैय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला, तसेच सरकारच्या विरोधात कुणीही काहीही बोलले कि त्याच्यावर हल्ला होतो, असे स्पष्टपणे मांडले. याीवेळी त्यांनी गंमतीत किरीट सोमैय्या यांना मंचावरुन म्हटले कि, “किरीट जी तुमच्यावर आणखी एक गुन्हा आता दाखल होऊ शकतो तुम्ही आज इथे या मंचावर आल्यामुळे, सोमैय्या मैदानावर ही सभा असल्याने ही तुमची बेनामी संपत्ती असल्याचे सांगून तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो.” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
पेट्रोल आणि डिझेलवर सर्व राज्य दिलासा देत असताना तुम्हाला काय अडचण :
पेट्रोल आणि डिझेलवर राज्यसरकार जो कर आकारते त्यावर सर्व भाजपशासित राज्यांने दिलासा दिला आहे, असे असताना महाराष्ट्र राज्य सरकारला नेमका काय त्रास आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदारसिंह पूरी यांनी सरकारचा बुरखा टरा टरा फाडला, तर हे केवढे चिडले? हे लोक सायकली घेऊन फिरतात, मात्र १५ रुपयांचा कर कमी करणे यांना जड जात आहे.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
एकूणच या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधत सरकारची पोल खोल केली. मात्र त्यांनी एक मोठा इशारा देखील दिला. ते १४ मे नंतर सरकारची पोल खोल सभा घेणार आहेत. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या सभेकडे लागले आहेत.
