
‘१९९२ मध्ये जुलै मध्ये मी नगरसेवक झालो, त्यानंतर वकील झालो आणि डिसेंबर मध्ये हा नगरसेवक एडव्होकेट देवेंद्र फडणवीस बाबरी ढाचा पाडण्यासाठी अयोध्येत होता. त्यावेळी तुम्ही कुठे होता? आम्ही सुरुवातीपासून संघर्ष करत आज इथवर पोहोचलो आहोत, सोन्याचा चमचा घेऊन या जगात आलेलो नाही.” असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार चिमटा काढला.
काल देवेंद्र फडणवीस यांना टोमणे मारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या कारसेवेवर टीका केली होती. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या शरीरयष्टीवर भाष्य करत ‘तुमचा पाय जरी बाबरी मशीदीवर पडला असता तर मशीद खाली आली असती.’ असे देखील म्हटले होते, ज्याला आज फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले. मुंबई येथे उत्तर भारतीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते आज बोलत होते.
“मी खोटे बोलणार नाही, मला याची शरम नाही. आज माझे वजन १०२ किलो आहे. १९९२ मध्ये १२८ किलो होते. मात्र उद्धव ठाकरे यांना वाटत अलेल कि असे बोलून ते माझे राजकीय वजन कमी करू शकतात, तर ते मात्र शक्य नाही.” असे म्हणत त्यांनी अतिशय स्पोर्टिंगली या विषयावर भाष्य केले. “मी माझ्या राजकीय वजनाने या सत्तेची बाबरी मशीद पाडल्याशिवाय राहणार नाही. अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.”
मी अयोध्येत केवळ बाबरी मशीद पाडण्यासाठीच नाही, तर त्या आधीच्या कारसेवेत देखील गेलो होतो. आणि बदायुच्या जेलमध्ये अनेक दिवस मी बंद होतो. ती जेल मला अजूनही लक्षात आहे, जिथे आम्ही राष्ट्रीय कारणासाठी बंद होतो, मात्र त्यावेळी तुम्ही कुठे होते? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
वाघ व्हायचं असेल तर निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो, नुसतं वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही. कुठल्या आव्हानांचा सामना तुम्ही केला? कुठल्या आंदोलनात तुम्ही होता? आज कोरोनाचे आव्हान २ वर्षे आपण पेलले, तेव्हा तुम्हीच सांगा कोण मैदानात होते? आम्ही Alive होतो आणि उद्धव ठाकरे Facebook Live वर होते.” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेतील भाषणाला खणखणीत उत्तरे दिली. अतिशय खमकेपणानी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक टोमण्याला मुद्देसूद उत्तर दिले.
आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नाही, तर तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे
सामान्य मुंबईकरांचा पैसा जो तुम्ही लुटला आहे, तो त्याला परत मिळावा यासाठी आम्हाला मुबंई तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे. कोणाच्या बापाची औकात आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याची? असे म्हणत त्यांनी ठाकरे यांना खडसावले.
“कालची सभा ही उद्धव ठाकरे यांनी भाजपसाठी नव्हे तर सोनिया गांधींसाठी घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिवीगाळ करत त्यांनी ‘मी तुमचाच आहे’ असे दाखवणाच्या प्रयत्न केला.” असे देखील ते यावेळी म्हणाले, “मात्र त्यांना यावेळी हे माहीत नाहीये कि, भारताच्या स्वातंत्र्य सेनानींच्या यादीत डॉ. हेडगेवार यांचे देखील नाव आहे, आणि ते जंगल सत्याग्रहात जेलमध्ये बंद देखील होते” इतिहास न वाचता, ठाकरे यांनी कालचे भाषण केले, असेही ते यावेळी म्हणाले.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बैठकीला आयपीएल समजून त्यात बसतील तर या महाराष्ट्राचे काय होईल? पाणी वीज मिळत नाही, ओबीसी आरक्षण गेले आहे, शेतमजुराचे, बारा बलूतेदाराचे हाल होत आहेत, त्याकडे कोण पाहणार आहे? आयपीएल समजून तुम्ही आपले मनोरंजन केले, मात्र सामान्य माणसाचे हाल होत आहेत, ते तुम्ही बघत नाही.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
या सभेत त्यांनी म्हटले कि, “ज्यावेळी या सरकारकडे बोलायला काही नसते, त्यावेळी ते असे शरीरयष्टीवर आणि इतर गोष्टींवर बोलतात. कारण यांच्याकडे मुद्देसूद टीका करण्यासारखे काहीच नाही. राजमहालातून राज करणाऱ्यांना गरीबांच्या समस्या कधीच कळणार नाहीत.” असेही ते यावेळी म्हणाले.
‘सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया,
तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं पीकर भी जी गया|”
हे म्हणून एका उत्साहानी सळसळणाऱ्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी या सभेची सांगता केली.
