‘खेल कुर्सी का’ अखेर जिंकले एकनाथ शिंदे, शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, तर देवेंद्र फडणवीस असणार उपमुख्यमंत्री



महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस इतकी अधिक उलथापालथ होतेय, कि काय होणार याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार असे सगळ्यांना वाटले होते, मात्र नियतीला काही औरच मंजुर होते, आणि आज झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी जाहीर केले कि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी ७:३० वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली.

असे असताना फडणवीस यांनी आधी जाहीर केले होते कि ते मंत्रीमंडळात सामिल होणार नाहीत, आणि बाहेरूनच त्यांचे सरकारवर लक्ष असेल. मात्र केंद्रीय हायकमांडच्या आदेशानुसार अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी होकार दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.



एकूणच या सर्व घडामोडींमुळे सामान्य माणसाला मात्र धक्का बसला आहे. जनता फडणवीस यांना मुख्यमंत्री पदी बघत होती. मात्र फडणवीस यांनी या पदाचा त्याग केला आणि यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा समोर आला आहे. एकूणच या सर्व घडामोडी खूपच रंजक होत्या आणि याची चाहूल खुद्द उद्धव ठाकरे यांना देखील लागली नसणार. त्यामुळे या एका खेळीतून अनेक पक्षी मारले गेले.

आता म्हणायला अशी शिवसेना उरली नाही. ठाकरे यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री पदी शिंदे यांना बसवून भाजप आपोआपच मोठी झाली, आणि मुख्यमंत्री पदाची भाजपला हाव नाही हे देखील यातून स्पष्ट झाले. एकूण काय तर महाराष्ट्रात आता नवीन आणि रंजक असा राजकीय खेळ रंगणार.

या मध्ये पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.