गडचिरोलीची पूरस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा



महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते, यासाठी दरवर्षी अनेक उपायययोजना आणि प्रयत्न केले जातात. या वर्षी महाराष्ट्राच्या गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यासाठी निघाले आहेत. पूरस्थितीची पाहणी करून गरजूंना मदत करण्यासाठी यापुढे उपाययोजना करण्यात येतील असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यात आधी नागपूर येथे गेले आणि तिथे विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यानुसार नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा पाचही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पाचही तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद आहे. सध्या जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी नदी नाल्याला पूर परिस्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे.