महाराष्ट्राची ऐश्वर्या जाधव, टेनिस जगातील नवीन हीरा …!


महाराष्ट्राने आजवर खेळ जगताला अनेक हिरे दिले आहे. सचिन तेंडुलकर, अपर्णा पोपट, सुनील गावस्कर, अंजली भागवत नावं घ्याल तितकी कमी. आता या नावांच्या यादीत आणखी एक नाव जोडल्या गेलं आहे, ते म्हणजे एश्वर्या जाधव. टेनिस या खेळ जगतात ऐश्वर्या आता महाराष्ट्राचं नाव मोठं करतेय आणि तिला संपूर्ण जगातून शुभेच्छा मिळताएत. अंडर १४ ज्युनियर विंबल्डन चँपियनशिप मध्ये तिला खेळण्याची संधी मिळाली आहे, आणि ऐश्वर्या जागतिक स्तरावर भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करतेय, या बद्दल महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे.



ऐश्वर्या ५ वर्षाची असताना पासून टेनिस खेळायला लागली आणि वयाच्या नवव्या वर्षापासून ती विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. तिने अनेक जिल्हा, राज्य आणि नंतर राष्ट्रीय स्तराच्या प्रतियोगितांमध्ये विजय मिळवला. यानंतर तिने सरळ गरूडझेप घेत अतिशय कोवळ्या वयात प्रसिद्ध अशा अंडर १४ ज्युनियर विंबल्डन चॅंपियनशिप मध्ये भाग घेण्याचे ठरवले. तिची निवड झाली, आणि तिने आपल्या खेळाने सगळ्यांची मने जिंकून घेतली.

ऐश्वर्या अतिशय सर्वसामान्य घरातील एक असामान्य खेळाडू आहे. मूळच्या कोल्हापुरची ऐश्वर्या आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आज कोल्हापुर, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाचे नाव मोठे करतेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत, आणि तिच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली आहे.

“कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे मन:पूर्वक अभिनंदन! ऐश्वर्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि यशाची सर्व शिखरं तिला गाठता येवो, यासाठी तिला मनापासून शुभेच्छा! Proud of you, Aishwarya!” असे फडणवीस त्यांच्या ट्वीट मध्ये म्हणाले आहेत.

ऐश्वर्याच्या पुढील वाटचालीसाठी तिला आभाळभर शुभेच्छा….!