राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला बुधवार १० ऑगस्ट पासून सुरुवात होणार असल्याची माहिती आज समोर आली आहे. तशा आशयाचं पत्रक आज विधीमंडळ सचिवालयाने काढले आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी असलेली मोहर्रमची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. आणि या दिवशी विधीमंडळाच्या सचिवालयाचे कामकाज सुरु राहणार असल्याची माहिती सुद्धा या पत्रकात देण्यात आली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत हे अधिवेशन अतिशय महत्वाचे असणार असे दिसून येत आहे.

राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी अधिवेशन बुधवार, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीपासून विधान भवन, मुंबई येथे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार, दिनांक 09 ऑगस्ट ते गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट, 2022 या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या असून उपरोक्त कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य आहे.
उद्या होणार शपथविधी 18 मंत्री शपथ घेणार :
राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाचे मिळून 18 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. एकूण 20 जणांचे मंत्रिमंडळ असणार आहे.
या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या या अधिवेशनात काय होतं, कुठले मुद्दे मांडले जातात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
