पालघर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा पहिला झेंडा पालघर जिल्हा परिषदेत फडकला आहे. भारतीय जनता पक्षाच्या साथीने पालघर जिल्हा परिषदेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा अध्यक्ष हाेणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन हाेऊन महाविकास आघाडीला पायउतार करत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सत्तेत येणार आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रकाश निकम यांची अध्यक्ष म्हणून तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. शिंदे गटाला महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला आहे.
पूर्वीच्या शिवसेनेचे 20 पैकी 20 सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने सत्ता परिवर्तन झाले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रकाश निकम यांनी अध्यक्ष पदासाठी भाजपचे पंकज कोरे यांनी उपाध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज केला दाखल होता. ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे.
