“केंद्र सरकारशी समन्वय करत, कोरोना संदर्भात बदलत्या परिस्थितीचा सातत्याने अभ्यास करुन शासनाला वेळोवेळी माहिती देण्यासाठी एक हाय पावर कमिटी किंवा टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल.” अशी माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सदनात दिली. सध्या चीनमध्यो कोरोनाच्या झालेल्या विकट परिस्थितीचे पडसाद जर भारतावर पडले तर अशा वेळी महाराष्ट्राची काय भूमिका असेल आणि अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे? यासाठी एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स नेमण्यात येईल का? असा प्रश्न विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केल्यावर त्यांना उत्तर देत फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.

चीनमध्ये सध्या कोरोनाची अतिशय भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. विशेषज्ञांच्या मते येत्या ९० दिवसांमध्ये अर्थात तीन महिन्यांमध्ये चीनमधील ६०% जनता आणि जगातील १०% जनता ही कोरोनाबाधित असेल. चीनमध्ये रुग्णालयांची परिस्थिती अतिशय वाईट झाली असून, मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. तसेच दफनभूमी येथे देखील २४ ते ७२ तासांचे वेटिंग आहे. अशी सगळी परिस्थिती चीन मध्ये उद्भवल्यानंतर चीनच्या शेजारी देशांना अलर्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भारताला देखील सावध करण्यात आले असून, येत्या काळात भारतात देखील पुन्हा एकदा कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी शंका वर्तविण्यात येत आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच २०२१च्या मे महीन्यात भारताने कोव्हिडची सगळ्यात भयंकर लाट अनुभवली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांनी आपला जीव गमावला. आणि मृतांची संख्या अत्यधिक होती. या सगळ्यात महाराष्ट्र कोरोनाच्या काळात रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर होता. त्यामुळे तशी परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू नये यासाठी महाराष्ट्राची पुढची योजना काय असेल आणि यासाठी एखादी समिती नेमण्यात येईल का ? असा प्रश्न विरोधी पक्षाकडून आल्यावर त्यावर अतिशय मुद्देसूद उत्तर देत फडणवीस यांनी तात्काळ अशी एक कमिटी किंवा टास्कफोर्स गठित करणार असल्याचे सांगितले आहे.
