आग्रा महानगरपालिकेने ताज महालासाठी पाठवलेल्या थकबाकीच्या नोटीसमध्ये म्हटलंय की १५ दिवसांत कर जमा न केल्यास ताज महाल जप्त केला जाईल. रक्कम भरण्याकरता १५ दिवसांची मुदत दिली आहे. ताजमहाल या जगप्रसिद्ध वास्तूसाठीही पाणी आणि मालमत्ता कर भरण्याची नोटीस मिळाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने ताजमहालसाठी सुमारे दोन कोटी रुपये पाणीपट्टी आणि सुमारे दीड लाख रुपयांचा मालमत्ता कर भरावा अशी थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आग्रा किल्ल्यासाठी पाच कोटी रुपये सेवा कर भरण्यास स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ऐतिहासिक वास्तू आणि राष्ट्रीय स्मारकांना अशा प्रकारच्या करांतून सूट देण्यात येते. असे आग्रा येथील पुरातत्त्व खात्याच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. परंतु अनेक इमारतींना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातून दिलासा मिळण्याकरता जे पात्र आहेत त्यांना तो दिला जाईल असे महापालिका आयुक्त निखिल तुकाराम फुंडे यांनी सांगितले. आग्रा कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुरातत्त्व खात्याला आग्रा किल्ल्यासाठी पाच कोटी रुपयांचा सेवा कर वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
महापालिकेच्या या कृतीचा पुरातत्त्व खात्याच्या आग्रा सर्कलने निषेध केला आहे. पुरातत्त्व खाते देशभरातील सुमारे चार हजार राष्ट्रीय स्मारकांची देखभाल करते. यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही करांचा भरणा खात्याने केलेला नाही. ताजमहाल आणि दौला यांची कबर ही राष्ट्रीय स्मारके असून त्यांना हे कर लागू होत नाहीत. आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार अशा प्रकारच्या नोटिसा पहिल्यांदाच आल्या आहेत. असे आग्रा सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी सांगितले.
