दिशा सालियान मृत्यु प्रकरणाची चौकशी आता मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असल्याची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी सदनात ते बोलत होते. ते म्हणाले कि, “दिशा सालियान प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात येईल, सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असून इतर कुणाकडेही काही पुरावा असल्यास तो पोलिसांकडे देण्यात यावा.” दिशा सालियान प्रकरणावरुन आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग यांची केस सीबीआयकडे (CBI) होती. नविन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.
विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, दिशा सालियन हयात नसताना त्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियनची चौकशी करायचं असेल तर पुजा चव्हाणची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करु नका.
शिंदे गटाच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळेंच्या वक्तव्यानंतर शिंदे सरकार आक्रमक झाले आहे, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्राकडून मागवणार असून महाराष्ट्र पोलिस पुन्हा तपास करण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. दिशा सालियन मृत्यूचा मुद्दा भरत गोगावलेंकडून विधानसभेत उपस्थित करण्यात आला. मृत्यूआधी दिशासोबत कोण कोण होतं? दिशाच्या मृत्यूचं गूढ कधी उकलणार? असा सवाल गोगावलेंनी सभागृहात उपस्थित केला.
