पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित झाल्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार काॅंग्रेसवर भडकले आहेत. काॅंग्रेसने उमेदवारी दिली असती तर असे घडलेच नसते असे पवार यांनी म्हटले आहे. तांबे यांच्याबाबत बाेलताना अजित पवार म्हणाले, माझ्यासारख्या माणसानं काँग्रेससारख्या पक्षाबद्दल बोलणं योग्य नाही, पण सत्यजित तांबेंना जर काँग्रेसनं उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं. त्यामुळे नंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांचं आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील.
सत्यजित तांबे यांना काॅंग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अजित पवार यांनीही पूर्वी आपला संताप व्यक्त केला हाेता. आता त्यांचा विजय निश्चित झाल्यावर पुन्हा एकदा सुनावले आहे. तांबे कुटुंबाकडून सत्यजित यांना उमेदवारी देण्याची मागणी असताना काॅंग्रेसने त्यांचे वडील सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली. यामागे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांचे कारस्थान असल्याचा आराेप केला जात आहे. सुधीर तांबे यांनी काॅंग्रेस पक्षाचा एबी फाॅर्म मिळालेला असतानाही अर्ज भरला नाही. तांबे यांनी कधीही आपण भाजपचा पाठिंबा घेतला असल्याचे म्हटले नव्हते. तरीही शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या मागे राष्ट्रवादीला फरफटत जावे लागले. त्यामुळे अजित पवार संतप्त झाले आहेत.
