जागर यात्रा बोंबलली, आता सन्मान महाराष्ट्रामधून आव्हाडांनी मिटकरींना वगळले!

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने 3 फेब्रुवारीपासून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमाेल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली ‘महापुरुष महासन्मान जागर यात्रा’ काढण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही केवळ घाेषणाच ठरली अन यात्रा बाेंबलली. आता आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा अशा दाैऱ्याची घाेषणा केली आहे. मात्र त्यातून अमाेल मिटकरी यांना वगळले आहे. महाराष्ट्राला खरा इतिहास समजावा म्हणून आम्ही बाहेर पडतो आहोत.  सुषमा अंधारे, संभाजी भगत, वैशाली डोळस आम्ही सोबत जाऊन महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा असा हा दौरा असणार आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांना आपणच घाेषणा केलेल्या महापुरूष संवाद जागर यात्रेचा विसर पडला आहे.

गेल्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक की धर्मवीर’ असा वाद राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी निर्माण केला हाेता. त्यावरून पवार यांच्यावर टीकाही झाली हाेती. यावेळी जितेंद्र आव्हाड व अमोल मिटकरी महाराष्ट्रभर दौरे करून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्री बाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ते स्वातंत्र्य संग्रामामधील अग्रणी नेते यांच्या गाथा ते लोकांपर्य़ंत न्यायचे राष्ट्रवादी काॅंग्रेसने ठरवले हाेते.  राज्यभर मेळावे घेऊन  पुरोगामी विचाराचे पक्ष,व्यक्ती ,संस्था यांना आमंत्रित करण्याचेही ठरले हाेते. परंतु, काेठे माशी शिंकली हे कळले नाही आणि 3 फेब्रुवारीपासून निघणारी ही यात्रा प्रत्यक्षात आलीच नाही. आता आव्हाड यांनी पुन्हा दाैऱ्याची घाेषणा केली असली तरी त्यातून अमाेल मिटकरी यांना जाणीवपूर्वक बाजुला ठेवले आहे.