अडबालेंचा विजय, बेगानी शादीमें महाविकास आघाडी दिवानी

नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघात विजय झाल्याचे ढाेल महाविकास आघाडी पिटत असली तरी बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी महाविकास आघाडीची अवस्था असल्याची टीका विदर्भातून हाेत आहे. मुळात अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवारच नव्हते. आघाडीच्या त्रांगड्यात उमेदवारी काेणाला द्यायची यावर एकमत हाेत नसल्याने अडबाले यांना पाठिंबा दिला. आता त्यांच्या विजयाचे श्रेय महाविकास आघाडी घेत आहे.

विदर्भ शिक्षक संघाने 22 मार्च 2021 राेजीच म्हणजे दीड वर्षांपूर्वीच अडबाले यांची उमेदवारी घाेषित केली हाेती. यावेळी महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय झाला नव्हता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटलेल्या या जागेवर काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याचे कारण म्हणजे त्यांना दुसरा उमेदवारच मिळत नव्हता. यापूर्वी महाविकास आघाडीत उमेदवारीवरून त्रांगडे सुरू झाले हाेते. शिवसेनचे (ठाकरे गट) गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला हाेता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे  सतीश इटकेलवार यांचा अर्ज कायम राहिला हाेता.  त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले हाेते.

मुळात नागपूरची ही जागा शिवसेनेला गेली हाेती. नाशिकमधील अनपेक्षित घडामोडींमुळे काँग्रेसला परत मिळाली . काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत अस्पष्टता होती. पक्षाचे काही नेते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अडबाले यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रही होते तर काहीं नेत्यांचा कल हा शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्याकडे होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आली तरी काँग्रेसचा पाठिंबा देण्याबाबत निर्णय होत नव्हता. दुसरीकडे नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला तरी राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी मात्र अर्ज कायम ठेवला. त्यामुळे इटकेलवार यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.

अडबाले की झाडे यापैकी कोणला पाठिंबा द्यावा याबाबतही काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. यंग टिचर्स असोसिएशनसह माजीमंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबोले यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे तर विधानपरिषदेचे सदस्य अभिजित वंजारी यांचा आग्रह शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडे यांच्यासाठी होता. त्यामुळे कसातरी निर्णय झाला आणि लाज वाचविण्यासाठी सुनील केदार यांचा आग्रह मान्य करण्यात आला.
अडबाले यांचा विजय झाल्यावर मात्र महाविकास आघाडीतील तीनही पक्ष विजयाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यामध्ये काॅंग्रेस आघाडीवर आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांना यामध्ये भूमिकाच नव्हती. तरीही ते हा विजय स्वत:चा असल्यासारखे म्हणत आहेत, अशी टीका हाेत आहे.