नाशिक : उमेदवारीचा घोळ घालणाऱ्या काँग्रेसला सत्यजीत तांबे यांनी भाजपच्या साथीने धडा शिकवला आहे. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील यांचा 29,465 मतांनी पराभव केला आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातून पहिल्याच फेरीपासून तांबे आघाडीवर होते. महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. पाचव्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली.
महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानांपैकी 1 लाख 29 हजार 456 इतकं मतदान पार पडलं होतं. यानंतर आज याची मतमोजणी पार पडली. सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाचे नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक पातळीवर पाठिंबा जाहीर केला होता. विखे पाटील यांचे कार्यकर्ते सत्यजित यांच्या प्रचारात सक्रिय होते. भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी आपला उमेदवार दिला नव्हता.
