मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान करणार उदघाटन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी महाराष्ट्राला आणखी एक भेट देत असून 10 फेब्रुवारीपासून मुंबई ते सोलापूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी रोजी धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सोलापूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशी प्रायोगिक तत्त्वावर  गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकातून पुणे-सिकंदराबाद आणि सोलापूर ते मुंबई या दोन मार्गांवर ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून दोन्ही रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

उद्घाटनाच्या दिवशी सोलापूर स्थानकावरून दुपारी तीन वाजता ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ मुंबईच्या दिशेने धावणार आहे. मुंबई ते सोलापूर दरम्यान ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ ताशी 120 किलोमीटर वेगाने धावेल. ती पुण्यामार्गे जाणार असल्यामुळे पुणेकरांना ‘वंदेभारत एक्स्प्रेस’चा सुखद प्रवास लवकरच अनुभवता येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई वरून सोलापूर मार्गे गुरुवारी पुण्यात दाखल झाली. त्यानंतर सदर गाडी काही काळ थांबविण्यात आली. सायंकाळी चार वाजून 50 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. 16 डब्यांची ‘वंदेभारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. ती पुण्यात नऊ वाजता दाखल झाल्यानंतर ती मुंबईला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.