भाजप सोमवारी दोन्ही उमेदवारी अर्ज भरणार

पुणे : आम्ही ताकदीने या निवडणूकीत उतरणार असून, निवडणूकीत कधीही धोका पत्करायचा नसतो आणि गाफील रहायचे नसते हे ओळखून लढण्याची तयारी केली आहे आणि सोमवारी दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूकीसाठी महायुतीची बैठक कसबा पेठेत पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या बैठकीला बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), शिवसंग्राम संघटना, पतितपावन संघटना, रासप, रयत क्रांती आणि शहरातील सर्व प्रमुख नेते आणि कसबा परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांची शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, प्रदेश सचिव किरण साळी, संपर्कप्रमुख अजय भोसले, लीना पानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे, रिपाइं आठवले गट शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अ‍ॅड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे भारत लगड, कालिंदीताई गोडांबे, पतितपावन संघटनेचे स्वप्नील नाईक उपस्थित होते.

ताकदीने एकत्रित लढणार :

बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदारसंघ आहे. आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी; यासाठी सर्वांची भूमिका आहे. मात्र, तरीही गाफिल न राहता ही निवडणूक भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती यांच्यासह सहयोगी घटक पक्ष सर्वजण पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.

घर फोडण्याची परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे. नजिकच्या काळात मी संशोधन करुन एक पत्रकार परिषद घेणार आहे. सत्ता आल्यावर सत्तेचा दुरुपयोग केला आणि अशाप्रकारे विश्वासघात कुणी केला. जे आज ‘उबाठा’ गटाचे रोज उठून गद्दारी केली असे सांगत आहेत त्यांना मला हेच सांगायचे आहे, की 2019 मध्ये त्यांनीदेखील गद्दारीच केली आहे असेही चंद्रकांतदादा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. दोन्ही काँग्रेसने उद्धवजींना पळवल्याचे ते म्हणाले.