राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नुकतीच एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीत त्यांनी केलेले गौप्यस्फोट चांगलेच चर्चेत आहेत. सध्या प्रत्येक नेता काहीतरी गुप्त करत असतो त्याच पद्धतीने अजित पवार यांनी एक गोष्ट केली. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत चाळीस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची कल्पना दिली होती तसेच शरद पवार यांनी सुद्धा याबद्दल उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती हे सगळं उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलं होतं. आमदारांवर आपला विश्वास आहे आणि त्यामुळे आपल्याला खात्री आहे की हे आमदार फुटणार नाहीत तसेच हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले असे अजित पवार म्हणाले.
हा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. प्रसारमाध्यमांनी मात्र हा विषय फारसा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही पण अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर किंवा गौप्यस्फोटानंतर प्रसार माध्यमे शांत कशी आहेत. अजित पवार यांनी सरळ उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहेय. उद्धव ठाकरे गाफील राहिले त्यांनी आपल्या आमदारांवर विश्वास असल्याचे सांगितलं आणि हा विषय टाळला. उद्धव ठाकरे जरी म्हणाले असले हा आमचा अंतर्गत विषय आहे तरी शरद पवार किंवा अजित पवार यांनी संबंधित आमदारांना समजावून सांगणं गरजेचं होतं. त्याचं कारण म्हणजे त्यावेळी हे लोक देखील सत्तेत होते, आमदार निघून गेल्यावर त्याचा फटका शिवसेनेला नाही तर सरकारला सुद्धा बसू शकतो. आमदार गेल्याने सरकार अल्पमतात येऊ शकते याची कल्पना शरद पवारांना होती असं असताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना त्याबद्दल माहिती का दिली नाही. शरद पवारांना जर या बंडाची कल्पना होती तर त्यांनी त्याचा सरकारवर काय परिणाम होईल हे उद्धव ठाकरेंना सांगणं गरजेचं होतं. असं असताना उद्धव ठाकरेंनाच जबाबदार धरताना शरद पवार किंवा महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते याला जबाबदार नाहीत का? हा प्रश्न इथे निर्माण होतो.
अजित पवार यांनी ही घटना आत्ताच का सांगितली, ही घटना होऊन आता आठ नऊ महिने झाले. जूनमध्ये बंड झालं होतं त्यानंतर एवढा कालावधी लोटला आहे. ठाकरे गट शिंदे गट हे रोजच मोठ्या प्रमाणात एकमेकांवर आरोप करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांवर टीका करत आहेत असं असताना याची पूर्व कल्पना जर अजित पवार यांना होती तर आमदार बाहेर पडणार याची कुजबूज होती असं असताना त्या पक्षातील आमदारांना भेटून त्यांचे मन वळवण्याचं काम त्यावेळी अजित पवार यांनी का केलं नाही? हा प्रश्न आहे. अजित पवार आता सांगतात की उद्धव ठाकरे गाफील राहिले म्हणून सरकार पडले तर मग आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत बाहेर पडलेले आमदारांवर टीका करून काय साध्य होते. याचे उत्तर देखील अजित पवार यांनी द्यावे. त्याच वेळी जर हे लोक पक्षातून बाहेर पडणार नाहीत यासाठी काही प्रयत्न केले असते तर कदाचित तुमचं सरकार कोसळलं नसतं.
आघाडीचे सरकार होतं तेव्हा महाविकास आघाडीतील नेते नेहमी सांगत होते की, आमची आघाडी भक्कम आहे, आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही पंचवीस वर्षे सत्तेत राहू पण तसं त्यांच्या कामातून दिसत नव्हतं व त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी कल्पना दिली होती की अंतर्गत कलहामुळे हे सरकार पडेल आणि तसेच झाले. आमदार फुटणार हे माहीत असून आणि त्यामुळे सरकारला धोका निर्माण होऊ शकतो हे माहिती असून सुद्धा कोणीच काही पाऊल उचललं नाही यावरून एक स्पष्ट होतं की महाविकास आघाडी मधील नेत्यांना आता हे महाविकास आघाडीचे ओझं झाला असावं. अजित पवारांनी सरकार का सोडलं त्याला जबाबदार कोण? उद्धव ठाकरेच याला जबाबदार असल्याचं माध्यमांना सांगितल आहे.
