काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच टीका केली आहे. तसेच त्यांनी अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, तांबे यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. भुजबळ यांच्या विधानामुळे अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
“मी इतकी वर्ष झाली, राजकारणात आहे. पण अशा प्रकारे एबी फॉर्म कोण घेतं आणि फॉर्म घेताना पाहत नाही, हे चुकीचं आहे. फॉर्म घेताना सर्व काही पाहिलं जातं. त्यामुळे हे असं कसं झालं? सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत. यावर आता बाळासाहेब थोरात साहेबांनी बोललं पाहिजे. खरं काय झालं हे थोरात साहेबच सांगू शकतात, असं माझं म्हणणं आहे. जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावरून मला वाटतं की सत्यजीत तांबे काँगेसमध्ये परतणार नाही” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं, हा घरातला प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांनतर शिवसेना आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शुभांगी पाटील यांना चांगली मते मिळाली. ती काही कमी मते नाहीत. महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. पण तांबेंनी मतदार नोंदणी चांगली केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या विजयात झाला, असंही त्यांनी सांगितलं.
