नाना पटोले काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत, राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप

मुंबई : अजित पवार यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तुटून पडली आहे. काॅंग्रेसमध्ये राहुन नाना पटोले भाजपचं उघडपणे काम करताहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे. नाशिक मधील वाद अजित पवार यांनी चव्हाट्यावर आणला असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्याला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे. सत्यजीत तांबे प्रकरणांवरून सध्या नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात सध्या खडाजंगी सुरू आहे.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयाने मला विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता चुकीचे एबी फार्म दिलेत. एक अमरावतीचा तर दुसरा नागपुर शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा होता. त्यामुळे आमच्या कुटुंबीयाला आणि बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र रचण्यात आले असे सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ताबेंना निवडून देण्यासाठी राष्ट्रवादीने मदत केली असा आरोप पटोले यांनी अजित पवारांवर केला आहे. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे हा आरोप मान्य केला. मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली. त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे. त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे मधल्या दीड महिन्यात काय झालं हे त्यानं जास्त मनाला लावून घेऊ नये.

इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या-त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार. सत्यजीतला पुढे त्याचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. सत्यजित तांबे यांनीही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे मागदर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे नाना पटोले आणखीनच संतप्त झाले आहेत. नाशिक निवडणूक प्रकरणात अजित पवारांनीच सगळा वाद चव्हाट्यावर आणला अशी टीका पटोले यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समाजमाध्यमावर पटोले यांच्यावर तुटून पडले आहेत.