अमाेल काेल्हेंनी संसदेत अजित पवारांसाेबत मानले फडणवीस, गडकरींचे आभार

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी संसदेत बाेलताना अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानले. आपल्या मतदारसंघातील 25 वर्षांचे स्वप्न पूर्ण हाेणार असल्याचे ते म्हणाले.


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बाेलताना डाॅ. काेल्हे यांनी भाजपच्या मंत्र्यांचे ताेंड भरून काैतुक केले. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात पुणे-नाशिक, पुणे- नगर आणि शिक्रापूर-चाकण या मार्गांवर सुमारे 20 हजार काेटी रुपयांच्या महामार्गाचे काम गडकरी यांच्या माध्यमातून हाेत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानताे. माझ्या मतदारसंघाचे 25 वर्षांपासून असलेल्या पुणे- नाशिक रेल्वे मार्गाला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही माेठे याेगदान लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्यावर कायमस्वरुपी भगवा ध्वज नाही. यासाठी आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची परवानगी नाही. जे सरकार काश्मीरमधून कलम 370 हटवू शकते ते सरकार आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या नियमात बदल करू शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला.