ईडीमुळे विरोधक आले एकत्र, पंतप्रधान मोदी यांचा ऐक्यावर निशाणा

नवी दिल्ली : अनेक विरोधी पक्ष मिले सुर मेरा तुम्हारा करत होते. देशातील जनता, देशातील निवडणुकांचे निकाल अशा लोकांना नक्कीच एका व्यासपीठावर आणतील, असे मला वाटायचे, पण तसे झाले नाही. पण या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजेत, कारण ईडीमुळेच ते एकत्र आले आहेत, असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ऐक्यावर साधला.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावर सत्ताधारी-विरोधकांची चर्चा झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले. “आपली ऋची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले. वेगवेगळे आकडे सादर करण्यात आले. यावरुन कुणाची किती समज आहे, त्यांचा उद्देश काय आहे, हे देखील समोर आले आहे. देश त्याची चिकित्सा करेलच. चर्चेत सहभागी झालेल्यांचे आभार मानतो.

मोदी म्हणाले, “अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.”

मोदी म्हणाले, यूपीएच्या 10 वर्षांत सर्वाधिक घोटाळे झाले. त्यांच्या निराशेचे कारण म्हणजे देशाची क्षमता समोर येत आहे. 2004 ते 2014 पर्यंत यूपीएने प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर केले. जेव्हा तंत्रज्ञानाच्या माहितीचे युग वाढत होते, त्याच वेळी ते 2G मध्ये अडकले होते. नागरी अणुकराराच्या चर्चेदरम्यान ते कॅश फॉर व्होटमध्ये अडकले होते. गेल्या काही वर्षांत हार्वर्डमध्ये अभ्यास झाला आहे. त्यांचा विषय होता – द राइझ अँड डिक्लाइन ऑफ इंडियाज काँग्रेस पार्टी. मला खात्री आहे की भविष्यात केवळ हार्वर्डमध्येच नव्हे तर मोठमोठ्या विद्यापीठांमध्येही काँग्रेसच्या पतनावर अभ्यास केला जाईल. अशा लोकांसाठी दुष्यंत कुमार यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे- तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधताना पंतप्रधान म्हणाले,जे नुकतेच जम्मू-काश्मीरमधून आले आहेत त्यांनी तिथे मोठ्या थाटामाटात आणि दिखाऊपणाने कसे जाता येते हे पाहिलेच असेल. गेल्या शतकात मी जम्मू-काश्मीरमध्येही यात्रा काढली होती आणि लाल चौकात तिरंगा फडकवण्याची शपथ घेतली होती. दहशतवाद्यांनी पोस्टर लावले होते की, बघूया कोणी आईचे दूध प्यायले आहे, जो इथे तिरंगा कोणी फडकावला आहे. मी 24 जानेवारीला जम्मूमध्ये एका मेळाव्यात सांगितले होते की दहशतवाद्यांनी कान देऊन ऐकावे. मी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता लाल चौकात पोहोचेन, मी सुरक्षेशिवाय येईन, मी बुलेटप्रूफ जॅकेटशिवाय येईन. आईचे दूध कोण प्यायले हे लाल चौकात ठरवले जाईल. लाल चौकात तिरंगा फडकवण्याची वेळ होती. लोक विचारू लागले तेव्हा मी म्हणालो होतो. साधारणपणे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भारताचा तिरंगा फडकवला जातो, तेव्हा भारताची शस्त्रे उंचावून सलामी दिली जाते. आज लाल चौकात तिरंगा फडकवताना शत्रू देशाच्या बंदुकीतून सलामी दिली जाते. आज आपण जम्मू-काश्मीरला शेकडोच्या संख्येने जाऊ शकतो. अनेक दशकांनंतर पर्यटनाचे अनेक विक्रम मोडले गेले आहेत. जे इथे (सत्तेत) बसायचे ते तिथे जाऊनही (विरोधात) अपयशी ठरले हे काळ सिद्ध करत आहे. देश वेगळेपणाने पुढे जात आहे. आज निराशेच्या गर्तेत बुडालेल्या लोकांनी निरोगी मन ठेवून आत्मचिंतन करणे ही काळाची गरज आहे.