राष्ट्रवादीला पुन्हा ‘ सम्राट औरंगजेबा’चा पुळका, चक्क महालाचे संवर्धन करण्याची मागणी

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा औरंगजेबाचा पुळका आला आहे. औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या महालाचे संवर्धन करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेचा त्यांनी निषेध नोंदवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, किला-ए-अर्क महल हा मुघल शासक ‘सम्राट औरंगजेब’ ने सण 1650 मध्ये बांधला होता. आज तो जीर्ण अवस्थेत पडून आहे. या महालाचे कालांतराने नुकसान झाले, असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याने गतवैभव गमावले आहे. परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद व मर्दाना महालाचा समावेश आहे. किले अर्कमध्ये आज ही आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनची जागा, दिवान ए आम व दिवान व खासची जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमाम खानेचे अवशेष आज ही बघू शकतो. आपणास विनंती आहे कि जी. 20 अंतर्गत शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले अर्काचा ही समावेश करण्यात यावा. संरचनेत देखभालीचा अभाव आहे, आणि या महालाची स्थिती बिघडली आहे.

पाटील यांनी राष्ट्रवादीला यावरून सुनावले आहे.त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढे आणला पाहिजे. औरंगजेबाचा इतिहास पुढे आणून काय भेटेल, असे सांगतानाच हा छ़त्रपती शिवराय यांचा महाराष्ट्र असल्याचे मत विनोद पाटील यांनी व्यक्त केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून आव्हाड यांच्यावर टीका होत आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांनी हे विधान केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.