महाराष्ट्र प्रदेशची भांडणे सद्या चव्हाट्यावर आली आहेत. त्यात नवल तसे काही नाही, सत्तेत होती तेव्हा सत्तेसाठी भांडत होती. शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाले तर काँग्रेस म्हणजे उध्वस्त धर्मशाळा आहे. २०१४ पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होता. शरद पवार सारख्या मुत्सद्दी नेत्यांना नमुन काँग्रेसने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवले. आघडीच्या काळात १५ वर्ष काँग्रेसचा मुख्यमंत्री राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १५ वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळू दिले नाही.
काँग्रेस पक्षाची ज्या राज्यात सत्ता आहे, त्याठिकाणची भांडणे आपण समजू शकतो. मात्र, इथं सत्ता नसताना भांडण होतायेत. २०१४ ला काँग्रेस पक्षाची सत्ता गेली. त्यानंतर २०१९ त्यांची स्थिती आणखी बिकट झाली. मविआ सरकार मध्ये जे महसूल मंत्री होते, काँग्रेस पक्षाचे गटनेते होते बाळासाहेब थोरात त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांचा वाद तांबे कुटुंबीयांच्या संबंधित आहे. तो बाळासाहेब थोरात यांच्या पर्यंत येईल असे वाटले नव्हते. मात्र तो त्यांच्यापर्यंत आला. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी उत्तरप्रदेशचे इम्रान प्रतापगडी राज्यात आले म्हणून काही नेत्यांचा आक्षेप होता. के.श्री.वेणू गोपाल,रणदीप सुरजेवाला अशा नेत्यांना ज्यांची निवडणुकीत अनामत वाचत नाही. त्यांना आणून राज्यसभेवर बसवायचे. म्हणजे दरबारी राजकारणी होते त्यांना मोठेपणा द्यायचा आणि जे प्रत्यक्ष राजकारणी आहे त्यांची उपेक्षा करायची.हे काँग्रेस पक्षाचे धोरण राहिलेले आहे.
बाळासाहेब थोरात हे लोकनेते आहे, दरबारी राजकारणी नाहीये. त्यांचं राजकारण विधानपरिषद आणि राज्यसभेवर चालते असे नाहीये. त्याचं घराणे हे १९३० पासून काँग्रेसशी निष्ठा ठेवून काम करणारे आहे. ते नाना पटोले सारखे काल भाजप मधून आलेले नेते देखील नाहीये. काँग्रेस पक्षाच्या बाबतीत देशभरातील एक आकलन असे आहे की, तरुण आणि जमिनीवरील नेत्यांना महत्व न देता दरबारी लॉबी या पक्षात जास्त चालते. खरतर काँग्रेसमध्ये हे कल्चर आणीबाणी नंतर इंदिरा गांधींच्या जवळ जो गोतावळा असायचा तेव्हा सुरु झाले आहे, ते आजतागायत तसेच सुरु आहे. खरतर ही मंडळी बहुधा दिल्लीतच असती. यांचा लोकांशी फारसा संबंध नसतो. बाकी जे सर्वसामान्य लोकांमध्ये राहून राजकारण करणारी मंडळी आहे. जी लोकांमध्ये राहून लोकांचे काम करते. त्यांचे पंख कापण्याचे काम हे करतात.
काँग्रेस पक्षाची दिवसेंदिवस पत घसरत आहे. आकडे कमी होत आहे. आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा प्रत्यय आला. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, शरगील, शहजाद पुणेवाला सारखे तरुण नेतृत्व बाहेर पडले आणि ते भाजपसाठी काम करताय. म्हणजे तुम्ही तरुणांना, निष्ठावंतांना संधी देत नाही. नाना पटोले सारख्या नेत्यांना जास्त महत्व दिले जाते त्यांनी लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी एक विधान केले होते की, गडकरींच्या विरोधात निवडणूक हरलो तर मी राजकारण सोडेल, त्यांना महत्व दिले जाते.
नुकतीच काँग्रेसची पदयात्रा महाराष्ट्रातून गेली आहे. हे आता “हाथ से हाथ जोडो” अभियान राबवणार आहे. किमान ज्या राज्यातून ही यात्रा गेली त्या राज्यात पक्ष बळकट असावा. पण तसे होताना दिसत नाहीये. बर ह्या सगळ्या गोष्टी पक्षांतर्गत लपून राहिल्या असत्या तर वेगळी गोष्ट होती. पण त्या जाहीरपणे समोर येत आहे. सत्यजित तांबेंनी पत्रकार परिषदेत एबी फॉर्म दाखवले, बाळासाहेबांनी दिल्लीला पत्र पाठवले. नाना पटोले हे विरोधकांना ह्या सर्व प्रकरणात दोषी ठरवण्यात व्यस्त आहे. मुद्दा असा आहे की, नाना पटोले विरोधकांना ह्या सगळ्या प्रकरणात संधी देतात का? सत्यजित तांबेंना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले असते. त्यांचे तिकीट तर ठरवून नाकारले. या प्रकरणात बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. तुम्ही आम्हाला भाजपच्या दरवाज्यावर ढकलत आहात, तुम्ही एक लक्षात घ्या ते तिकडे बेरजेचे राजकारण करायला बसलेले आहेत.
सुजय विखेंसाठी जागा सोडायला शरद पवारांनी नाकारले होते. काँग्रेसचे अंतर्गत राजकारण किंवा इतर सर्व गोष्टीच भाजपला आयते कोलीत देण्याचे काम करते. भाजपने यांच्यात भांडण लावले असे ह्या काँग्रेसच्या आरोपात तथ्य नाही. खरतर भाजपला आमंत्रण दिले तुम्ही या आणि आमच्या भांडणाचा फायदा घ्या. विशेष म्हणजे नेहमी काँग्रेस पक्षाची बाजू मांडणारे काँग्रेसच्या अंर्तगत मतभेदावर कधी बोलत नाही. ह्या अशा प्रकरणावरून काँग्रेसची राज्यात आणि देशात पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. आता महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडासमोर आहे. ह्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मधील मतभेद असा पद्धतीने समोर येणे. पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. ह्या निर्माण झालेल्या पोकळीत बाकीचे पक्ष पुढे येतील त्यावेळी तुम्हाला इतर पक्षांवर आरोप करता येणार नाही कारण तुम्हीच तुमच्या पक्षाचे नुकसान केले आहे.
