निरुपण परंपरेचा सन्मान ; नानासाहेबांनंतर आप्पासाहेब धर्माधिकारीही महाराष्ट्रभूषण

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, वडील आणि मुलगा दाेघांनाही महाराष्ट्रभूषण मिळण्याचा याेग या निमि्ताने साधला गेला आहे. शिंदे – फडणवीस सरकारने निरुपणाच्या परंपरेचा सन्मान केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेल्या ३० वर्षापासून निरुपण करत आहेत.अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या असून आदिवासी वाडी तसेच वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही ते करत आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन याची दखल संपूर्ण जगानं घेतली आहे. शिवाय रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, स्मशान आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहीरींमधील गाळ काढून स्वच्छ करणं यासह अनेक कामं या माध्यमातून केली जातात. यापूर्वी ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनाही  महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ‘महाराष्ट्र भूषण’चे मानकरी ठरले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार म्हणून गेली तीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, बालसंस्कार, पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांचे प्रचंड योगदान आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.