राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात 9 मार्चला दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तत्पूर्वी म्हणजे 8 मार्च रोजी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या रचनेत राज्यमंत्री नाहीत. त्यामुळं अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊन वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नेमण्यात आला नाही तर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर कोण सादर करणार असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यंदाचे अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार असून एकूण चार आठवड्यांचे अधिवेशन चालणार आहे. 9 मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी केली होती. तरी हे अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही.आता राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घ्यावे.अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे. यासोबतच सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
