कसबा आणि चिंचवडमध्ये मनसे कोणाला पाठिंबा देणार?

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेचे मतदारसंघ रिक्त झाले आहेत. या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 26 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणी मतदान होणार आहे.लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु या निवडणुकीत मनसेची काय भूमिका असणार, मनसे भाजपला पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.प्रमुख राज ठाकरे यांचे आदेश येईपर्यंत कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नका असे आदेश मनसचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना तसेच मनसेसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसे तटस्थ राहणार का? हे पहावे लागेल.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून टिळक वाड्याला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कसबा मतदारसंघामधून महिविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कसब्यात रवींद्र धंगेकर आणि रासने यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे कोणाला पाठिंबा देणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र मनसेनं सध्या तरी तटस्थतेची भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.