लोकशाहीची ताकद : एक साधा रिक्शेवाला आज आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री – “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  वाढदिवसानिमित्त खास…!”

आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा महाराष्ट्राला देशाच्या लोकशाहीवर पूर्ण विश्वास बसला आहे. कारण भारत एकमेव असा देश आहे जिथे एक साधारण चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, आणि एक साधा रिक्शेवाला देशाच्या एका महत्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री. हे किती ‘इंस्पायरिंग’ आहे याची प्रचिती आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिवन कहाणीकडे बघितल्यावर येते.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका क्षणाला राजकारणच सोडून दिले होते, हे तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा यावर विश्वास बसेल का? मात्र एक काळ असा होता, जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या या नेत्याच्या आयुष्यात मोठा भूकंप आला होता. एक साधा रिक्शेवाला, ते एक कार्यकर्ता ते एक महत्वाचा नेता आणि आता राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास वाखणण्याजोगा आहे.

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे वडील संभाजी नवलू शिंदे. शिंदे यांचे प्रथामिक शिक्षण ‘न्यू इंग्लिश डायस्कूल ठाणे’ येथे झाले. शिक्षणानंतर घरच्या परिस्थितीमुळे शिंदे हे ठाण्यात एक रिक्शाचालक म्हणून काम करत होते. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं एकनाथ शिंदेंनी काम करण्यास सुरूवात केली. सुरुवातीला एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केलं. ती नोकरी त्यांनी फार काळ केली नाही. त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवण्यास सुरूवात केली. ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतानाच एकनाथ शिंदे राजकारणाकडे झुकले.



त्यानंतर शिवसेनेचे तरुण तडफदार नेते आनंद दिघे यांच्या प्रभावाखाली त्यांनी १९८० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला, आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. ठाण्याच्या नागरिकांसाठी आपण काहीतरी चांगलं करायचं या उद्येशाने एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि काम सुरु केले. २००१ मध्ये आनंद दिघे यांचे निधन झाले, आणि ठाण्यातील शिवसेनेचा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडे आला.

एकनाथ शिंदे आणि लता शिंदे या जोडप्याला तीन मुले झाली. दिपेश, शुभदा आणि श्रीकांत, अशी त्यांची नावं. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करत असतानाच्या काळातच त्यांच्यावर मोठा आघात झाला होता.

एकनाथ शिंदे राजकीय जीवनात पुढे जात असताना त्यांच्यावर काळाने मोठा आघात केला. ते वर्ष 2000. एकनाथ शिंदे यांना दिपेश, शुभदा ही दोन मुलं अपघातात गमवावी लागली. 2000 साली घडलेल्या भयंकर घटनेनंतर एकनाथ शिंदे बरेच खचले होते. याच काळात त्यांनी रादकारण सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी त्यांना आनंद दिघे यांनी सांभाळलं आणि पुन्हा त्यांच्या पायावर उभं केलं.  एकनाथ शिंदे यांचा तिसरा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते राजकारणात आले. श्रीकांत शिंदे सध्या हे खासदार आहेत.

शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यानंतर एकनाथ शिंदेंना आनंद दिघे यांनी नगरसेवक पदाचं तिकीट दिलं. 1997 साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे 2001 साली त्यांच्याकडे ठाणे महापालिकेचं सभागृह नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले. 2004 पर्यंत एकनाथ शिंदे नगरसेवक म्हणून काम करत होते. त्यांचं ठाणे शहरातील काम आणि पक्षाबद्दलची एकनिष्ठा पाहून आमदारकीचं तिकीट देण्यात आलं.

एकनाथ शिंदेंची सुरू झालेली राजकीय कारकीर्द पुढे सुरू झाली. 2009 विधानसभा निवडणूक, 2014 विधानसभा निवडणूक अशा दोन्ही एकनाथ शिंदे ठाण्यातून पुन्हा आमदार झाले. यावेळी एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे 2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढवली होती. शिवसेनेनं भाजपासून वेगळं होतं, 64 जागा जिंकल्या. निकालानंतर भाजप-शिवसेनेची सत्ता समीकरणं जुळली नाही, त्यामुळे निकाल लागल्यानंतर शिवसेना विरोधी बाकांवर बसली आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते बनले. ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 या काळात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे विरोध पक्षनेता म्हणून काम केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री झाले. त्याचबरोबर 2014 ते 2019 या काळात ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. 2018 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या कार्यकारिणी वर्णी लागली. त्यांची शिवसेना नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडून फसवणूक झाल्याचे सांगत, आणि खऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांनी बंड पुकारला आणि अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी युतीचे सरकार पन्हा एकदा स्थापन केले, ज्यामध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले.

आणि अशा पद्धतीने ठाण्यातील एक साधा रिक्शाचालक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाला, आणि देशाच्या जनतेचा पुन्हा एकदा देशाच्या लोकशाहीवर अगाध विश्वास बसला.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा…!