नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर कदाचित सरकार वाचलं असतं – छगन भुजबळ

काँग्रेसच्या अंतर्गत वादात ठाकरे गटाने थेट भूमिका जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेब थोरात नाना पटोले वादात थेट भाष्य केलं आहे.महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही. त्यानंतर इतर पेच निर्माण झाले आणि सरकार कोसळलं असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना कोणाला विश्वासात घेतलं नाही. पटोलेंच्या राजीनाम्यानंतर दुसरा अध्यक्ष होऊ शकला नाही. नंतर सरकार कोसळलं नाना पटोले जर अध्यक्ष असते तर कदाचित इतर घटना घडल्या नसत्या. पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचण्याची शक्यता होती असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाना पटोले यांना घरचा आहेर दिला आहे. पटोलेंसारखे सक्षम नेते विधानसभा अध्यक्ष पदावर होते. पण त्यांच्या राजीनाम्यामुळे पुढील पेच उद्भवला अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. यशोमती ठाकूर यांनीही यास सहमती दर्शवली.