पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूची चौकशी आता एसआयटी मार्फत – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. वारिसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय. तसेच यामागील मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्या अशी मागणीही जोर धरतेय. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या प्ररकणाचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

दरम्यान या प्रकरणात संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत- निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले, त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे. या प्रकरणाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाखांचे अर्थसहाय्य मिळावं अशी मागणी राऊत यांनी या पत्राद्वारे केली आहे.