भारत आणि ऑस्ट्रेलिया गावस्कर – बॉर्डर करंडक मालिकेतील पहिला कसोटी सामना आज नागपूरमध्ये सुरू आहे. या मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल असेल, असे सांगण्यात आलं आणि झालंही तसंच. कारण रविंद्र जाडेजा-आर अश्विन या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. जाडेजाने ५ तर अश्विनने ३ बळी टिपत ऑस्ट्रेलियाचा केवळ १७७ धावांत खुर्दा पाडला. दरम्यान आर अश्विनने कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाच्या रेकॉर्डला गवसणी घालून आपल्या स्वत:च्याच शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा फिरकीपटू आर अश्विनने मोठा विक्रम केला आहे. त्यानं एलेक्स कॅरीला बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट घेण्याची कामगिरी केली. तसंच सर्वात कमी सामन्यात अशी कामगिरी करणाता तो भारतीय गोलंदाज ठरला. याआधी हा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता.
विशेष म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीनं विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने 89 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली असून त्याच्या आधी केवळ श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरन याने 80 सामन्यांत हा रेकॉर्ड केला आहे. ज्यामुळे त्यानं शेन वॉर्नसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. याशिवाय भारताकडून अशी कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळेनंतर अश्विन दुसराच खेळाडू आहे. याशिवाय सर्वात कमी चेंडू फेकून ही कामगिरी करणाराही अश्विन दुसरा खेळाडू आहे. त्याने एकूोण 23 हजार 635 चेंडूंमध्ये ही कामगिरी केली असून त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राथने 23 हजार 474 चेंडूत ही कामगिरी केली होती.
