गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणी आता १४ फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होत आहे. शिंदे गट व ठाकरे गटाची याचिका यादीत असून त्यावर सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार असल्याचे नमूद केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी घटनापीठाची स्थापना केली आहे. त्यात सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड व न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिम्हा यांचा समावेश आहे.
याशिवाय सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत निर्णय होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. या १६ आमदारांवर कारवाई होईल आणि महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. या सुनावणीत 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय होणार, यावर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून असणार आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. त्यावर दोन्ही गटांची सुप्रीम कोर्टात याचिका केल्या आहेत. तसेच 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरत आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारकीविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
