सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण ; निकाल राखून ठेवला

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला आहे. आज सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला. दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलून सुनावणी सुरू ठेवली अखेरीस जोरदार घमासान आणि दावे प्रतिदावे ऐकत अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे. पुढील तारीख मात्र कोर्टानं राखून ठेवली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर गेल्या आठ महिन्यांपासून युक्तिवाद सुरू होता. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.