सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची ठाकरे गटाची मागणी शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) फेटाळली आहे.तसेच पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलं ते नागपूरमध्ये बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, राबिया प्रकरणावरील निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण पाठव्याची मागणी संयुक्तिक नाही. आम्ही गुणवत्तेवर हे प्रकरण ऐकू. त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवायचं ते आम्ही ठरवू, असंही न्यायालयाने नमूद केले. अशा वेळी आम्हालाही असंच वाटतं की, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी करत आहे. वर्षभर निकालच लागू नये हे त्यांचं वेळकाढूपणाचं धोरण होतं. पण सध्या त्या धर्तीवर निकाल आला आहे. आता यावर नियमित सुनावणी होऊन अंतिम निर्णय लागेल असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
