शरद पवार तर 2006 पासून आजारी, गिरीश बापट यांच्या प्रचारावर चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

पुण्याचे खासदार गिरीश बापट कसबा पाेटनिवडणुकीच्या प्रचार करू लागल्याने महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. त्यांच्या आजारपणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार तर 2006 पासून आजारी आहेत. तरीही प्रचार करतात असा पलटवार त्यांनी केला आहे.

खासदार बापट प्रचारात सहभागी झाल्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली हाेती. त्यांना उत्तर देताना पाटील म्हणाले, प्रशांत जगताप यांनी दुसऱ्यांवर टीका करण्याआधी शरद पवार यांच्याकडे पहावे. शरद पवार हे 2006 पासून आजारी आहेत मात्र तरी देखील काम करत आहेत. गिरीश बापट प्रचारात आले याचा आम्हाला अभिमान आहे. कसबा पोटनिवडणूक ही रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी नाही तर भाजप विरुद्ध थेट काँग्रेस अशी आहे. महाविकास विरुद्ध भाजप अशी ही लढत नाही कारण त्यांचे काही अस्तित्वच नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला वाऱ्यावर सोडून दिले दिसत आहे अशी टीकाही पाटील यांनी केली.