उध्दव ठाकरेंची धगधगती मशालही वादाच्या भाेवऱ्यात

शिवसेनेचे माजी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या गटाची मशालही वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहे. जाॅर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने मशाल हे आपले चिन्ह असल्याचे म्हणत त्यावर हक्क सांगितला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंचे टेंशन पुन्हा वाढणार आहे.मशाल चिन्हावर दावा करत समता पार्टीने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी निवडणूक आयाेगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की निवडणूक आयाेगाने शिवसेनेतील वादावर निर्णय दिलेला आहे. पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण त्यांना बहाल केले आहे. उध्दव ठाकरे यांच्या गटाचे नाव काय असेल याचा निर्णय निवडणूक आयाेगाच करणार आहे. सध्या हा गट महाराष्ट्र किंवा अन्य काेणत्याही राज्यात कायदेशिर नाही. त्यामुळे त्यांना मशाल चिन्ह देण्यात काेणतेही अाैचित्य नाही. त्यामुळे निवडणूक आयाेगाला विनंती आहे की मशाल चिन्ह निवडणूक आयाेगाने परत घ्यावे. हे चिन्ह अन्य काेणत्याही पक्षाला देऊ नये कारण त्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण हाेऊ शकताे.

निवडणूक आयागेाने तात्पुरत्या स्वरुपात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाला मशाल चिन्ह दिले हाेते. त्यानंतर ठाकरे गटाने हे चिन्ह लाेकांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले हाेते. ठाकरे गटाच्या कार्यक्रमांमध्येही हे चिन्ह ठळकपणे लावले जात हाेते. अंधेरी पाेटनिवडणुकीतही ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी याच चिन्हावर निवडणूक लढविली हाेती. त्यामुळे मशाल चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या त्या एकमेव आमदार आहेत. या परिस्थितीत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडून गेल्यास पुन्हा नवीन चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.