धनुष्यबाण मिळताच शिंदे-फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली

शुक्रवारी धनुष्यबाण आणि शिवसेनेबाबत निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळताच आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला असून, शिंदे गट आणि भाजपमधील अनेक इच्छूक मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशात उद्या ते कोल्हापुरात बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर या हालचाली वाढल्याचं दिसत आहे.निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता येत्या एक दोन महिन्यात महापालिकेच्या निवडणूका जाहीर केल्या जातील, असं उद्धव ठाकरेंनी काल माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं. त्यामुळे रविवारी अमित शहा यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत आगामी निवडणूकांबाबतही चर्चा केली जाणार अशी माहिती मिळत आहे

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोललं जातं होतं. मात्र आता निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना शिंदे गटाला दिल्यानं मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.