भारतीय निवडणूक आयाेगाने एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत ठरविली आहे. त्यामुळे शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार निर्माण झाला आहे. पक्षाची सर्व मालमत्ताही एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना भवनवर अधिकार सांगितला असला तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या तरतुदीमुळे शिवसेना भवन ताब्यात घेण्यात शिवाई सेवा ट्रस्टचा अडसर येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सामना दैनिक किंवा शिवसेना भवन हे शिवसेना पक्षाच्या नव्हे तर इतर संस्थांच्या नावावर केले आहे.
शिवसेना भवनची अधिकृत मालकी ही शिवसेना पक्षाची नसून शिवाई ट्रस्टची आहे. शिवसेना भवन उभारण्यास सुरूवात झाली तेव्हा शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते, मिनाताई ठाकरे, वामन महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम जयंत देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हे शिवाई ट्रस्टचे जुने ट्रस्टी होते. या शिवाई ट्रस्टची आणि त्याच्या ट्रस्टीजची नोंद जागेच्या मालमत्ता पत्रकावर करण्यात आली आहे. काही विश्वस्तांचा राजीनामा आणि काहींचे निधन झाल्यामुळे आता नवीन ट्रस्टी आहेत. शिवाई ट्रस्टचे वर्तमानातील ट्रस्टीज् म्हणून रविंद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे आहेत. हे सर्व जण उध्दव ठाकरे यांच्याच गटात आहेत. त्यामुळे शिंदे गटाला शिवसेना भवनवर हक्क सांगणे अवघड हाेणार आहे. मात्र, शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना भवनच्या उद्घाटनपर भाषणाचा दाखला दिला जात आहे.
शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. त्यामुळे शिवसेना भवन हे शिवसेनेचे आहे आणि आता अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे असाही युक्तीवाद केला जात आहे.याच भाषणात शिवसेनप्रमुख म्हणाले हाेते की शिवसेनेला पुढे नेण्याची जबाबदारी तुमचीच आहे. पण उद्धवलाही पक्ष चालवताना काही पथ्यपाणी पाळावीच लागतील. मी जशी शिवसेना चालवली तशीच चालवायला हवी. उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिप्रेत असणारी शिवसेना चालविली नाही हे निवडणूक आयाेगानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना भवनावर आमचाच हक्क असल्याचे शिंदे यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.
