देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली. त्यानंतर मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंनी विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले. त्यांना आज सत्य काय आहे समजलं आहे अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केली.मोदी@ 20 या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. शाह म्हणाले एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं हा सत्याचा विजय झाला आहे. आमच्या युतीला मोठा विजय मिळाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही मिळालं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जे लोक खोटेपणाच्या आधारावर हुंकारत होते त्यांना आता सत्य काय आहे ते समजलं आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी मी भाजपाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी आम्ही निवडणूक युती म्हणून लढलो. स्वतःच्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावून त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. निवडणुकीत विजय होणं पराभव होणं या गोष्टी सुरूच असतात. पण जे लोक आपला विश्वासघात करतात त्यांना कधीच माफ करायचं नसतं. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं. एका पत्रकाराने विचारलं की, धनुष्यबाण आपल्याला मिळाला. तेव्हा ते म्हणाले की धनुष्यबाण आम्हाला मिळाला नाही. तर आम्ही तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गहाण पडला होता तो आम्ही सोडवून आणला. हे त्यांचं भाष्य अत्यंत योग्य होते.उद्धव ठाकरेंनी तर बाळासाहेबांची विचारधारा आणि शिवसैनिकांसोबतही दगाबाजी केली आहे. आता ‘दूध का दूध और पानी का पानी झालं आहे.’ असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना माफ करता कामा नये असे आवाहन केले.
