निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. याचिका दाखल करण्यासाठी उद्या या असे न्यायालयाकडून ठाकरे गटाला सांगण्यात आले आहे.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाणार आहोत आम्ही सर्वेोच्च न्यायालयात याला आव्हान देवू. धनुष्यबाण तुम्ही घेऊ शकणार नाही. तु्म्ही धनुष्यबाण काही काळ चोरू शकता.
धनुष्यबाण चोरल्याचा आनंद त्यांना घेऊ द्या. शिवसैनिकांनो कुठेही खचू नका मी खचलो नाही. शिवसेनाचा विजय होईल आता विजयाशिवाय माघार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदारांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आयोगाच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आयोगाने एकतर्फी निर्णय दिल्याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला.येत्या 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गट पक्षादेश अर्थात व्हीप जारी करील असाही मुद्दा चर्चेत आला. पण न्यायालयात पक्षाचा वाद प्रलंबित असताना व्हीप बजावता येत नाही अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
