संजय राऊत यांच्या अपात्रतेबाबत शिंदेगट आग्रही – संजय शिरसाठ

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. शिरसाठ यांनी संजय राऊत यांचा उल्लेख पिसाळलेला कुत्रा म्हणून केला आहे.

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर देणे आम्ही महत्त्वाचे समजत नाही. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि धनुष्यबाण अधिकृतरित्या दिलं आहे. आज बैठकीतही बरीच चर्चा झाली आहे. संजय राऊत अपात्र कसे होतील यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याचं, संजय शिरसाठ यांनी सांगितलं आहे.

संजय राऊताच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्याच्यावर बोलायचं नाही. त्याच्यावर अपात्रतेची कारवाई कशी होईल हे आम्ही पाहतोय. मुख्यमंत्री यांच्यावर काय भाषा वापरतात. त्यांच्यावर गुन्हे दाखलही झालेले आहेत. याप्रकरणी राऊतांना ८ दिवसात उत्तर देऊ, असा इशाराच संजय शिरसाटांनी दिला आहे. तसेच, शिवसेनेकडून बजावण्यात येणारा व्हीप हा ५६ आमदारांसाठी असणार यात ठाकरे गटाच्या आमदारांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

विधीमंडळ कार्यालयानंतर शिवसेना भवनावर दावा करणार का, असे विचारले असता संजय शिरसाठ म्हणाले, शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही कधीच त्याच्यावर दावा केला नाही. ज्यांना पैशाचा लोभ आहे त्यांची ती प्रॉपर्टी आहे. पक्ष किंवा ट्रस्टकडून शाखा नाहीत शिवसैनिकांमध्ये वाद होणार नाहीत असे स्पष्ट त्यांनी केले आहे.