केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उध्दव ठाकरे गटाने बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निवडणुक आयोगावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “शिवधनुष्य रावणाला नाही पेललं तर मिंध्यांना काय पेलणार? शिवधनुष्य चिन्ह आणि शिवसेना पक्ष मिळवण्याची आपली लढाई सुरुच राहिल.” असे उध्दव ठाकरे म्हणाले.

“देशात अराजक माजवणं हाच त्यांचा हेतू आहे. बाळासाहेबांचा चेहरा लावत आहेत. स्वत:चं नाव लावावं किंवा वडिलांचं नाव लावून शिवसेना चालवून दाखवावी. माझं आव्हान आहे. राष्ट्रीय हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. नाहीतर २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. त्यानंतर लोकशाहीला छेद देणारा नंगानाच या निवडणूकीनंतर सुरू होईल.”
निवडणुक आयोगावर बोलताना पुढे ते म्हणाले, “निवडणुक आयोग बरखास्त झाला पाहिजे. आयुक्तांची निवड निवडणुकीद्वारे व्हावी. आयोगाला निकाल देण्याची इतकी घाई का? गुंतागुंत वाढवण्यासाठी हा निकाल देण्यात आला. १६ जणांच्या अपात्रेबाबत उद्यापासून सुनावणी होणार आहे. मी मध्ये सांगितले होते की, तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय तो अयोग्य असून त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. दोन तृतीयांश आमदार एका संख्येने गेलेले नाहीत. त्यामुळे घटनेनुसार दोन तृतीयांश आमदारांना कुठल्याही पक्षात विसर्जित करावे लागतेच. ते विसर्जित झालेले नाहीत. त्यामुळे ते घटनेनुसार अपात्र ठरवले गेले पाहिजेत. त्याआधीच निवडणूक आयोगाने घाई करण्याची काय गरज होती?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
